Saturday, 22 July 2023

आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीइरशाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

 आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीइरशाळगडाचे बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

            नवी मुंबई, दि.21:- रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यांवर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले आहेत. ही घटना घडल्याचे कळताच कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणांना बचाव कार्यासाठी आदेश दिले. डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: 19 जुलै रोजी रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे. खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळाची तयारी केली.  


            डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले. एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. इरशाळवाडी पर्यंत पोहचण्याचा मार्ग सोपा नाही. निमुळता रस्ता तोही धड मातीचा नाही की धड दगडाचा नाही. डोंगरमाथ्यावरुन वेगाने येणारे पावसाचे पाणी, पायवाटेच्या खाली उतार अशा परिस्थितीत आयुक्त कल्याणकर स्वत: घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बचाव कार्याचे नेतृत्व केले. 24 तासाहून अधिक काळ आयुक्त डॉ. कल्याणकर आणि महसूल यंत्रणेसह इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत आहेत. दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.


            आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी प्रशासन आणि खासगी यंत्रणांमार्फत युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या 4 तुकड्या एकूण 100 जवान , टीडीआरएफ चे 80 जवान, इमॅजीका कंपनीचे 82 कामगार तर सिडकोचे 460 कामगार बाचाव कार्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण 900 पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. 5000 फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे. या दूर्घटनेत वाचलेल्या लोकांच्या निवाऱ्यासाठी 60 कंटेनर मागविण्यात आले असून त्यापैकी 30 ते 40 कंटेनर आज घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्या राहण्याची तात्पूरती व्यवस्था या कंटेनरमध्ये करण्यात आली आहे. तसेच 20 तात्पूरती शौचालये आणि 20 तात्पूरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून बचावकार्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आल्या आहेत. मात्र घटनास्थळ डोंगर माथ्यावर असल्याने या यंत्रसामग्री घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे स्वत: संपूर्ण बचावकार्यावर लक्ष देत आहेत.


            या दरड प्रलयात इरशाळवाडीतील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत होवून पशुधनाचे व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


            ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:-38222872300, IFSC Code:-SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.


ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे,मो.8390090040, खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी. लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मदत करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.  


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi