Saturday, 22 July 2023

महिला उद्योजिका स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ : संगीता पाटील

 महिला उद्योजिका स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र चेंबरचे नेहमीच पाठबळ : संगीता पाटील


महाराष्ट्र चेंबरची महिला समिती आणि मुंबई जिल्हा सहकारी बँकेतर्फे व्याख्यान संपन्न


मुंबई : `मूळत: उद्यशील स्वभाव असलेल्या महिलांनी उद्योजिका होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले पाहिजे. महिला सक्षम आहेतच, त्यांनी उदयोग क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे पाठबळ कायम राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, महिला उद्योजकता समिती व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित `आंतरराष्ट्रीय व्यापार व महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी `या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मुंबई फोर्ट येथील डॉ. डी. एन. रोडवरील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, महिला उद्योजकता समितीच्या को-चेअरपर्सन कविता देशमुख, महाराष्ट्र चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम झाला.

या वेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील म्हणाल्या, `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर अंतर्गत महिलांसाठी धोरण आखले गेले आहे. ३६ जिल्ह्यासाठी हे धोरण आहे. महिला या मुळातच उदयोजक, उत्तम प्रशासक असतात, मात्र अनेकदा ते घरापुरतं मर्यांदित राहतं. घराबाहेरच्या विशाल जगात त्या गुणांचं सार्थक व्हावे, म्हणून उद्योजिका होण्याचे स्वप्न महिलांनी प्रत्यक्षात आणायला हवे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर महिलांसाठी दीपस्तंभाचे काम करीत असून महिलांना सातत्याने पाठबळ देत राहणार आहे.

चेंबरतर्फे राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र चेंबरने महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पाठबळ दिले आहे. केवळ वर्कशॉप, सेमिनार एवढाच उद्देश महाराष्ट्र चेंबरचा नसून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वोतोपरी मदत करते. महिलांनी उद्योग जगतात पाऊले ठेवायला हवीत. परंतू, नवीन उद्योग स्थापन करताना महिलांसमोर भांडवल हा विषय असतो. त्यामुळे आपल्या बँकेतर्फे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असेही समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी आवाहन केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या संचालिका रुपा नाईक यांनी `आंतरराष्ट्रीय व्यापार` या विषयावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी काय करावे, महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधी, केंद्र आणि राज्य सरकारच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय सरव्यवस्थापक समीर महापुष्पे, संदीप सुर्वे यांनी `महिला उद्योजकांसाठी भांडवल उभारणी` या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई बँकतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. महिलांसाठी विशेष कर्ज योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi