वन्यप्राण्यांमुळे शेतपीकांच्या होणाऱ्या
नुकसानभरपाईच्या रकमेत वाढीची कार्यवाही सुरु
– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 : वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांचे आणि फळबागांचे होणारे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट केली असून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे; तसेच शेत पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येत असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य डॉ. विनय कोरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, विधानसभेत कालच वन्यप्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसानभरपाई प्रदान करणेबाबत विधेयक मंजूर करण्यात आले असून विधानपरिषदेत ते मांडण्यात आले आहे. यानुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास, गंभीर जखमी अथवा जखमी झाल्यास त्याला नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्यात आली आहे. याशिवाय, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशू मृत्युमुखी पडल्यास त्यातही नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये 30 दिवसांच्या आत संबंधितांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले असून उशीर झाल्यास त्यावर व्याज द्यावे लागणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
ते म्हणाले की, कोल्हापूर वनवृत्तामध्ये कोल्हापूर, सातारा, सावंतवाडी, सांगली व चिपळूण या पाच वनविभागांचा समावेश होतो. या वनक्षेत्रामध्ये मुख्यतः बिबट, हत्ती, रानगवा, रानडुक्कर, माकड, वानर, मगर, सांबर इत्यादी वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारे शेत पिकांचे व फळबागांचे जसे की नारळ, सुपारी, कलमी आंबा, केळी व इतर फळझाडे यांचे नुकसानीकरीता अदा करावयाच्या अर्थसहाय्यासाठी सर्वप्रथम 2015 मध्ये रक्कम निश्चित करण्यात आली. त्यानंतर सन 2016 मध्ये ऊस व इतर शेत पिकांकरीता नुकसान भरपाईची कमाल मर्यादा 25 हजार रुपये इतकी निर्धारित करण्यात आली. या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यातील पन्हाळा, मलकापूर व पेंडाखळे या वनपरिक्षेत्रात मागील ३ वर्षामध्ये वन्यप्राण्यांमुळे मनुष्यहानीच्या 2 घटना, मनुष्य जखमीच्या 11 घटना, पीक नुकसानीच्या 3 हजार 63 तसेच पशुधन हानी व जखमीच्या 126 घटनांमध्ये एकूण 276 लाख 33 हजार रुपये नुकसान भरपाई संबंधितांना अदा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात वन्यप्राण्यांना जंगल क्षेत्रातून खाद्य मिळावे यासाठी कोल्हापूर वनविभागाअंतर्गत असलेल्या एकूण 11 वनपरिक्षेत्रात एकूण 329 हेक्टर क्षेत्रावर वन्यप्राण्याचे खाद्य म्हणून हत्ती गवताची लागवड करण्यात आलेली आहे. कुरण विकास करण्यात येत आहे. केंद्र शासनाने त्यास निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. वन्यप्राणी जंगल क्षेत्रामधून मालकी क्षेत्रात येऊ नये यासाठी जंगल क्षेत्र व मालकी क्षेत्रांच्या हद्दीवर वन्यप्राणी प्रतिबंधक चर (खंदक) खोदण्यात आलेले आहेत. वन्य प्राणी वनक्षेत्रातून मालकी क्षेत्रात आल्यास त्यास हुसकावून लावण्यासाठी त्या वन्य प्राण्याला इजा न होता परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरुपपणे सोडण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील 5 वर्षात वन्यप्राण्यांना वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी वनक्षेत्रात वनतळी, माती बंधारे, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे बांधण्यात आलेले आहेत व त्याच बरोबर जंगल क्षेत्रात असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्यात आलेले असल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
सदस्य नाना पटोले, आशिष जयस्वाल, प्रताप अडसड आणि अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न विचारले.
000
No comments:
Post a Comment