*मेडिटेशन आणि विचार.....*
आजकाल जो उठतो, तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मन शांत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करून पाहतोही, पण ते कुठे एका जागी थांबते? डोळे बंद करून ध्यानधारणेचा प्रयत्न केला असता, असंख्य विषय मनात थैमान घालत असतात. अशाने मन शांत होण्याऐवजी जास्तच अशांत होतं.
मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया.
मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते.
*सकाळची वेळ निवडा...*
वरील गोष्टी आत्मसात झाल्या, की ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळची वेळ निवडा. उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.
*ध्यानधारनेच्या वेळी संगीत लावू नका...*
मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकत ध्यानधारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमेल आणि गाण्याशी संबंधित विचार मनात डोकावू लागतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा
डॉ. प्रमोद ढेरे,
No comments:
Post a Comment