Tuesday, 27 June 2023

ग्रामीण आणि आदिवासी भागातआरोग्य सेवा विस्तारावर भर

 ग्रामीण आणि आदिवासी भागातआरोग्य सेवा विस्तारावर भर


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि 26 :- विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा लाभ देण्यात येत असून ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात आरोग्य सेवा अधिक विस्तारण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मंत्रालय येथील दालनात डॅशबोर्ड आणि विश्लेषणात्मक पद्धतीच्या माध्यमातून नागरिकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी यासंदर्भात बैठक झाली. यावेळी माजी आमदार डॉ. परिणय फुके, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, ई हेल्थ सिस्टिमचे संचालक विजय अरोरा, ई हेल्थ सिस्टिमचे संचालक अनिल धुम्मा, अरविंद सावरगावकर, रेलटेल कॉर्पोरेशनचे संचालक प्रवीण जैन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आरोग्य सेवा सर्वांना परवडणारी असली पाहिजे, यावर विशेष भर देण्यात येत असून, समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यात येत आहेत. आरोग्य सेवांचे लाभ घेण्यासाठी एकच सर्वसमावेशक कार्ड असावे यावरही भर देण्यात येत आहे. याद्वारे रुग्णांची एकत्रित 'मेडिकल हिस्ट्री' तयार होऊ शकेल. ज्याद्वारे रुग्ण आणि आरोग्य व्यवस्थेलाही याचा लाभ होईल. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांच्या दृष्टीने असा प्रकल्प उपयुक्त ठरु शकेल. अशा पद्धतीचा प्रकल्प उभारण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.


डॅशबोर्ड आणि विश्लेषणात्मक पद्धतीच्या माध्यमातून


नागरिकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी


            अशा प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सकारात्मक आणि क्रांतीकारक बदल घडू शकतील. यामध्ये राज्यातील नागरिकांच्या संपूर्ण आरोग्य कल्याणासंदर्भात सकारात्मक आणि सर्वसमावेशकपणे विचार करण्यासंदर्भात प्रस्तावित आहे.


            याअंतर्गत ग्रामपंचायत, शाळा अशा ठिकाणी प्रीव्हेंटिव्ह वेलनेस सेंटर स्थापन करण्याचे तसेच नागरिकांसाठी विश्लेषण आणि डॅशबोर्डसह तपासणी पद्धत विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य, नियोजन आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय साधण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच यामध्ये आरोग्य विषयक 170 पॅरामीटर्स, टेलीमेडीसीन आणि समुपदेशन, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी संच, जिओ टॅगिंग, हेल्थ कार्ड, हेल्थ अॅप, स्टेट ऑफ आर्ट डायग्नोस्टिक लॅब यांचा समावेश असणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.



-----000-------




No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi