Tuesday, 27 June 2023

महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात

 महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात


- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर


            मुंबई, दि. २६ : महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी. सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, यासंदर्भातील तक्रारींची तत्काळ चौकशी करुन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) नोंदविण्यात यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधान भवनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि गोरक्षा समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.


            या बैठकीस अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना आणि नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पशू कल्याण मंडळाचे कमलेश शहा, महाराष्ट्र गौशाळा संपर्क प्रमुख लक्ष्मीनारायण चांडक, गोरक्षा आणि गोसेवा क्षेत्रात कार्य करणारे डॉ. विनोद कोठारी, रमेश पुरोहित, ॲड.राजु गुप्ता, ॲड. सिध्द विद्या, रिटा मकवाना, अशोक जैन, संदीप भगत, गणेश परब, जनक संघवी आदि उपस्थित होते.


            महाराष्ट्राच्या सीमेवर अन्य राज्यातून गोहत्येसाठी होणारी पशू वाहतूक रोखण्यात यावी, भरारी पथके स्थापन करण्यात यावीत, गोरक्षक कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे नोंदविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. पशू मांस तपासणी यंत्र (मीट टेस्टिंग मशीन्स) यांचा वापर करण्यात यावा, असे निर्देशही यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी दिले. येत्या दहा दिवसांत या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा विधान भवनात बैठक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या संदर्भातील संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येऊन सुस्पष्ट धोरण आखून गृह विभागाच्या माध्यमातून गोरक्षा उद्दिष्टाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.



०००



 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi