Sunday, 18 June 2023

ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक

 ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक


                                                            -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


         नागपूर, दि.18 : “विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे, या मंदिरात आपल्या सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


            छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या उभारणीचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाल्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिल देशमुख, आमदार अभिजीत वंजारी, आमदार मोहन मते, बबनराव तायवाडे, तांजावर येथील श्रीमंत शिवाजी राजे भोसले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, मंगेश डुके आदी उपस्थित होते.


            “ज्ञानाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होत असल्याने येत्या काळात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जीवनावरील साहित्य येथे उपलब्ध होईल. विद्यापीठ परिसरामध्ये ऑडिटोरियम सेंटर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवनाचरित्र उपलब्ध होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रसंताची ग्रामगीता, ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ डिजीटल करण्यात येईल. राष्ट्रसंतांच्या नावाप्रमाणेच विद्यापीठातील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रेणादायी ठरेल. ज्ञानाने परिपूर्ण असणारी पिढी निर्माण करायची असल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श त्यांच्या समोर ठेवणे गरजेचे आहे.” असेही श्री. गडकरी म्हाणाले.  


            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष असून त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मार्फत हा पुतळा उभारला जाणार आहे. पुतळा उभारणीचे काम लोकसहभागातून केले जाणार आहे. नागपूर विद्यापीठाशी संबंधीत माजी विद्यार्थ्यांनी समाजातील दानशूर व्यक्तिंनी लोकसहभागाच्या या कार्यात मदत करण्याचे आवाहन, स्मारक समितीने केले आहे.


असा असेल पुतळा


            छत्रपती शिवरायांचा विद्यापीठ पसिरात उभा राहणारा पुतळा भव्य असेल अशी माहिती यावेळी स्मारक समितीने दिली आहे. पुतळ्याच्या चुबतऱ्यांची लांबी 20 फूट, रूंदी 15 फूट, उंची 9 फूट असेल तर या चबुतऱ्यांवर उभा राहणारा सिंहासनारूढ पुतळा 32 फूट उंचीचा असेल त्यावरील छत्र 7 फूट उंचीचे असेल. संपूण ब्राँझ धातूने बांधला जाणारा हा पुतळा 10 हजार किलोग्रॅम वजनाचा असेल. प्रसिध्द मूर्तिकार सोनल कोहाड हे शिल्प साकारणार आहे.


0000


 


 



 


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi