Thursday, 1 June 2023

 पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठीनिधी उपलब्ध करुन देणार


- मंत्री संदिपान भुमरे


            मुंबई, दि. ३१ : “औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.


            मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा - १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


            मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक - १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधित गावांतील प्रलंबित कामांसह विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडून निधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.


            पैठण तालुक्यातील १० गावांमधील प्रकल्पबाधितांच्या २६ नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुतुबखेडा, तांदूळवाडी, तुळजापूर, अमरापूर, पिंपळवाडी पि., तारुपिंपळवाडी, आगरनांदूर, घेवरी, लाखेफळ, इसारवाडी आदी पुनर्वसित गावांच्या समस्या सोडवाव्यात. प्रकल्पबाधित गावांमध्ये न झालेल्या कामांची चौकशीसाठी समिती नेमली असून समितीने तातडीने अहवाल सादर करावा, जेणेकरून संबंधित कामे तातडीने करण्यात येतील, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.


0000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi