Sunday, 11 June 2023

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

 श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती


            मुंबई, दिनांक 11 : श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली. 


            यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल.


            जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल. 


            महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकार तर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.



00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi