Sunday, 7 May 2023

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

 मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


                मुंबई, दि. 7 : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


                महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


                विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


००००


दि. 7 मे, 2023


वृत्त क्र. 1480


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या


मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद


 


मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली विनंती


 


मुंबई, दि. 7 - मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.


          मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi