Thursday, 4 May 2023

खावटी कर्ज वाटप प्रक्रियेस गती द्यावी

 खावटी कर्ज वाटप प्रक्रियेस गती द्यावी


- सहकार मंत्री अतुल सावे.

            मुंबई, दि. 3 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. यानुसार पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध निधीतून कर्ज वितरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.


            आज मंत्रालयात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खावटी कर्जमाफीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार राजन तेली, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहसचिव श्रीकृष्ण वाडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विकास संस्थांच्या माध्यमातून खावटी कर्ज वाटप करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अल्पमुदत पीक कर्जाबरोबरच अल्पमुदत शेतीपूरक खावटी कर्ज वितरीत केले जाते. मात्र, प्रलंबित २५ कोटीचे खावटी कर्ज विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीतून वितरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा. तसेच थकीत कर्जदार सभासदांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर लेखापरीक्षण करून अपलोड करण्यात आल्या होत्या, संबंधित पोर्टलही सुरू करण्यात यावे, असेही निर्देश मंत्री श्री. सावे यांनी दिले.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi