शासकीय योजनांच्या जत्रेतून गडचिरोलीत 1.74 लाख नागरिकांना लाभ
जिल्ह्यात 40 ठिकाणी भरणार योजनांची जत्रा
गडचिरोली, दि.25 : ‘शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी’ हा हेतू समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा हे अभियान गडचिरोलीत विविध तालुक्यांमध्ये राबविले जात आहे. सरकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून शिबिरांचे आयोजन करून थेट गावागावात योजना पोहचविल्या जात आहेत. आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात 22 ठिकाणी योजनांची जत्रा भरविण्यात आली होती. यामध्ये एकूण 1 लाख 74 हजार 48 लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेतून लाभ मिळवून देण्यात आला. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आकांक्षित जिल्हा योजनेअंतर्गत ‘नागरिकांचे लाभ वितरण प्रणाली’ तयार करण्यात आली होती. या प्रणालीचा वापर करुन ज्या पात्र नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्या नागरिकांची यादी तयार करुन शासकीय योजनांची जत्रा गडचिरोलीतील तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
अभियानाची तयारी म्हणून दि. 01 एप्रिलपासून नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले होते. नागरिकांनी सीएससी केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवांमध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचे दाखले, वय व अधिवास, नॉनक्रिमीलीअर, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, नवीन व दुय्यम रेशन कार्ड, जॉबकार्ड, पीएम किसान योजनेचे नवीन व दुरुस्ती करुन लाभ देण्यात आला, राष्ट्रीय कुटुंब लाभार्थींना लाभ देण्यात आला, मतदार नोंदणी व दुरुस्ती करीता ऑनलाईन अर्ज मोफत दाखल करुन नागरिकांना मोफत लाभ वितरण करण्यात आले.
कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर, जंतनाशक औषधी वाटप करण्यात आले. कामगार विभागाने नागरिकांना कामगार कार्ड वाटप केले, आरोग्य विभागाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आयुष्यमान कार्डाचे (Gold card) नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र सरकार पुरस्कृत बॅंकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये पीएम सुरक्षा योजनेचे व पीएम जीवनज्योती विमा योजनेचे अर्ज नागरिकांकडून भरुन घेण्यात आले. ग्रामपंचायतमार्फत दाखल्यांचे वितरण करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाने नागरिकांना झाडे वाटप केली.
मस्य व्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मस्य व्यवसाय साधनावर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत नागरिकांना लाभ प्रदान करण्यात आला. तसेच नागरिकांना महाराष्ट्र विद्युत वितरण विभागामार्फत वीज जोडणी देण्यात आली. कौशल्य विभागांतर्गत तरुणांची कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंद करण्यात आली. उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत नागरिकांना रिनंबरींग देण्यात आले.
शासकीय योजनांच्या जत्रेत लाभाबरोबर विविध योजनांची माहिती अभियानस्थळी देण्यात येत आहे. शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमात स्थानिक खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विभाग आणि विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग असून गरजूंना लाभ वितरीत करण्यासाठी त्यांचे योगदान आहे. येत्या काळात उर्वरीत 40 ठिकाणी असेच यशस्वी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तालुका निहाय 22 उपक्रमांची आकडेवारी – गडचिरोली दोन कार्यक्रमातून 17 हजार 771, धानोरा एका कार्यक्रमातून 3 हजार 651, आरमोरी तीन कार्यक्रमातून 43 हजार 711, देसाईगंज दोन कार्यक्रमातून 16 हजार 174, कुरखेडा तीन कार्यक्रमातून 10 हजार 689, कोरची तीन कार्यक्रमातून 4 हजार 191, चामोर्शी दोन कार्यक्रमातून 31 हजार 756, मुलचेरा एका कार्यक्रमातून 6 हजार 600, एटापल्ली एक कार्यक्रमातून 3 हजार 278, भामरागड एक कार्यक्रमातून 7 हजार 106, अहेरी दोन कार्यक्रमातून 10 हजार 727 व सिरोंचा एक कार्यक्रमातून 18 हजार 394 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आले.
चौकट 1
सर्वसामान्य गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून एप्रिल, मे महिन्यात नागपूर विभागात आयोजित शासकीय योजनांच्या जत्रेतून विविध यंत्रणांमार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थींना योजनांचा लाभ देण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता लाभार्थींकडून करुन घेण्यात येत आहे. लाभार्थींकडून योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर केले जात आहेत. कोणत्याही गरजू लाभार्थींचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही याची जबाबदारी संबंधित विभाग घेत असून प्रत्येक जिल्हास्तरीय यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग आहे. गडचिरोली जिल्ह्याने या उपक्रमात आत्तापर्यंत चांगले काम केले असून 1.74 लाख लाभार्थीना लाभ दिला आहे, ही चांगली बाब आहे.
- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर
*****
शासकीय योजनांच्या जत्रेतून नागरिकांना चांगल्याप्रकारे मदत मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जनकल्याण कक्ष व तालुका जनकल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात तहसिलदार अध्यक्ष असून प्रत्येक विभागाचे तालुका अधिकारी सदस्य आहेत. या समितीमार्फत तालुकास्तरावर सनियंत्रण केले जाते. जिल्हास्तरावरून या उपक्रमाबाबत दैनंदिन आढावाही घेण्यात येतो. जिल्ह्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उर्वरित 40 शिबिरांमधून लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- संजय मीणा, जिल्हाधिकारी गडचिरोली
००००
No comments:
Post a Comment