*श्रीरामांचा मृत्यु....*🌹
आपल्यापैकी किती जणांना श्रीरामांच्या मृत्युची किंवा श्रीविष्णूंच्या या रामावताराच्या समाप्तीबद्दल माहित आहे? जरूर वाचा....
प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले. प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही.सर्व देवचिंतातुर झाले.भगवान विष्णूनां वैकुंठा त परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्याच्यावर ही कामगिरी सोपावली. परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तो पर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही असे सांगितले.
शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपावली. त्याने ती मान्य केली. पण त्यालाही हनुमंता ची भीती होतीच. म्हणून त्याने साधूचा वेष घेतला. बरोबर दुर्वास मुनींना घेतले. दोघेही अयोध्येत आले.
काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची ईच्छा प्रगट केली. रामरायांची भेट झाली. प्रभूंनी त्याला ओळखले. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले. लक्ष्मणा ला दारात पहारा देण्यासाठी उभे केले. कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. आज्ञा मोडणार्याला मृत्युदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले.एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. *प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्युअटळ आहे या सत्याची आठवण करून दिली.*
प्रभूंनी आपली विवषता बोलून दाखवली.. लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत असे सांगितले. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले. ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला.
तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले. त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगीतले. लक्ष्मणा ने नकार दिला.प्रभूंची आज्ञा सांगीतली. पण दुर्वास ऐकेनात. ते अत्यंत क्रोधीष्ट झाले. आपली भेट नाकारणार्या श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले. मुनींना आत जावू द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्युदंडाला सामोरे जावे लागेल. नाही जावू द्यावे तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले. रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला.
इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पहाताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले. प्रभूंनी त्याला मृत्युदंड घेण्यास सांगीतले. अयोध्येच्या बाहेर तु निघून जा हाच तुला मृत्युदंड असे सांगीतले. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला. राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरुपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पहात बसला.
इकडे प्रभू रामचंद्रांचा काळाने निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती, त्या फटीत ती अंगठी टाकली. हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत आले. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगीतले. हनुमान अंगठी काढू लागले.पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेणा. मग हनुमंताने सुक्ष्मरूप घेतले व त्या फटीत गेले. पण ती फट म्हणजे एक सुरंग होता. त्या फटीतुन हनुमंत थेट पाताळात गेले.
इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणांस सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयू मध्ये जातो असे सर्वांना सांगीतले. प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता आडवू लागले. प्रभू मात्र कोणाचे ऐकेणात. शेष त्यांची वाट पाहत होता.. प्रभू शरयू तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मण जी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले.
इकडे हनुमंत पाताळात पोहोचले. वासूकी ने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगीतले.वासूकीने त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला व यातून प्रभूंची अंगठी शोधून घेवून जा असे सांगीतले. परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या. सर्व रामरायांच्याच होत्या. त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगीतली.
आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत, हे ऐकून मारूतीराय मनोवेगाने शरयू तीरावर आले. सर्व प्रजाजन शोक करीत होते.
मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा शरयूतुन शेषावर पहूडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले. आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत, कोणीही शोक करू नका असे सांगीतले. आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा असा आशिर्वाद दिला. हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवीत्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या वर दिली. सर्वांचा निरोप घेवून प्रभूंनी वैकुंठाला गमन केले.
🙏🏻 जय श्री राम 🙏🏻
No comments:
Post a Comment