शेतकरी, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात प्रशिक्षण देणार
- कृषीमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दिनांक 28 : शेतकरी आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रासोबत सेंद्रिय शेती आणि प्रगत शेती या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी डाबर, टाफे कंपनी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात करार करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
मंत्री श्री. सत्तार यांनी आज मंत्रालयात डाबर आणि टाफे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चंद्रमणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, टाफे कंपनीचे टी. आर. केशवन, वरिष्ठ संशोधक डॉ. लक्ष्मण सावंत, डॉ. उदय खोडके, डॉ. डी. आर. कदम आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.सत्तार म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटाच्या काळात मदत करून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आज टाफे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यात कंपनीतर्फे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी करार करण्यासंदर्भात चर्चा झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यातील हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकरी स्वयंपूर्ण होण्यास नक्की मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुर्वेदिक वनस्पतींचे करणार संगोपन
आयुर्वेदात महत्त्व असणाऱ्या अनेक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सापडणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पतींचे संगोपन करण्यासंदर्भात डाबर कंपनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पूरक जोडधंदा उपलब्ध होईल, असेही मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment