Monday, 20 March 2023

येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणार

 येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणा


                            - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 20 : मच्छिमारांना डिझेल परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक असून 120 हॉर्स पॉवर पर्यंतच्या बोटींना डिझेल परतावा दिला जाणार आहे. एप्रिल महिन्यात यासाठी निधी उपलब्ध होताच हा प्रलंबित डिझेल परतावा देण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य राजन साळवी, भास्कर जाधव आणि नितेश राणे यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असून शासन मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे आहे. यापुढे मच्छिमारांना डिझेल परतावा नियमित देण्यासाठी विधी व न्याय विभागाची मदत घेण्यात येईल. बंदराची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येत असून पहिला अत्याधुनिक मच्छिबाजार सातपाडी येथे करण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय विभागातील विविध प्रश्न आणि 12 मैलांच्या सीमेबाहेर पर्सेसिन मासेमारी करणाऱ्यांच्या बाबत किनारपट्टीच्या सर्व राज्यात एकमत नाही. त्यामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन एकत्रितपणे येत्या 5 एप्रिल 2023 रोजी विचारमंथन करण्यात येणार आहे.


            काही दिवसांपूर्वी 10 लोकांच्या मच्छिजाळीचे नुकसान झाले होते. 10 मच्छिमारांची जाळी जळाल्याने त्यांना मत्स्यव्यवसाय करण्यास अडचण येत होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी त्या 10 मच्छिमारांना जाळीसाठी 54 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण आणण्यात आले आहे. यामध्ये मच्छिमारांना जवळपास 6 लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. शासकीय मत्स्यबीज केंद्र पीपीपी तत्तावर भाडेपट्टीने देणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून खाजगी मत्स्यबीज निर्मितीला चालना देणे, शासकीय आणि खासगी मत्स्यबीज संवर्धन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय सागरी क्षेत्रात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करणे, सागरी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेबाबत सुधारीत निर्णय घेणे, किसान क्रेडीट कार्डद्वारे मच्छिमार आणि मस्त्यशेतकरी यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे, असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi