Saturday, 25 March 2023

केमिकलमिश्रित हळदीच्या वापराला आळा घालण्यासाठी लवकरच बैठक

 केमिकलमिश्रित हळदीच्या वापराला आळा घालण्यासाठी लवकरच बैठक


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 25 : काही देवस्थानांच्या ठिकाणी केमिकल मिश्रित हळदीचा वापर केला जातो. येणाऱ्या काळात यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि अन्न व औषध प्रशासन अशा तीन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी हळदीमध्ये होत असलेली भेसळ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, आयुर्वेदातील हळद हे एक महत्वाचे पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. राज्यात हळदीच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. हिंगोली येथे स्थापन होणाऱ्या हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


            राज्यात हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण लागू करण्यात आले आहे. आगामी काळात हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi