Sunday, 26 February 2023

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न-

 देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई दि. 25 : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्र 1 ट्रिलीयन इकॉनॉमी देऊन देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे एबीपी नेटवर्कच्या “आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023” (Ideas of India Summit 2023) पर्व दुसरे कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.


            या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, गेल्या 8 महिन्यांत आमच्या शासनाने अनेक महत्वपूर्ण आणि विकासाला चालना देणारे निर्णय घेतले. समृध्दी महामार्ग, मुंबई मेट्रो, मुंबईतला सागरी महामार्ग, आपला दवाखाना, मुंबईतल्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट भूमिपूजन यासह 5 हजार किलोमीटरचे एक्सप्रेस कंट्रोल हायवे विकसित करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत.


            रस्ते,रेल्वे आणि समुद्री मार्ग बनवून केवळ देशालाच नाही तर जगाला अनुकरणीय असे परिवहन योजना आणण्यात महाराष्ट्र पुढे राहील. समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे,कोस्टल रोड आणि एमटीएचएल मार्ग हे महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


            राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे. केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात 13हजार 539 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रतील रेल्वे विकासासाठी मिळाला आहे. दावोस येथे झालेल्या परिषदेत विविध उद्योग समुहांशी 1 लाख 55 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यातून दीड लाख रोजगार निर्मिती होत आहे. याशिवाय ‘मित्रा’ समितीची स्थापना, आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत. कौशल्य विकासाबरोबरच पायाभूत सोयी सुविधा यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला असून महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


एबीपी नेटवर्कच्या श्रीमती रुबिका यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली.


000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi