Friday, 24 February 2023

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

 उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य


घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेने घडविली मुंबईची सफर.

            मुंबई, दि. 24 :- “साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली... झगमगाट बघितला... आनंद वाटला. पण सगळ्यांत जास्त समाधान वाटले ते तुम्हाला भेटून...’’ हे उत्स्फूर्त शब्द आहेत घाटंजी येथील वृद्ध कष्टकऱ्यांचे.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील कष्टकरी महिला आणि पुरुषांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून वृद्ध कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्व वृद्ध कष्टकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.


            वृद्ध कष्टकऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना 'एसटी'च्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. वृद्ध, निराधार आणि कष्टकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. कष्टकरी आणि वृद्धांना मुंबईची सफर घडवून त्यांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा रसिकाश्रय संस्थेचा उपक्रम स्तुत्य आहे.                      



जीवाची मुंबई- गरीब वृद्ध कष्टकऱ्यांची सहल


            ज्यांची मुले सक्षम आहेत, त्या वृद्धांनाही अनेकदा कुणी तीर्थयात्रेला नेत नाहीत. स्वत:च्या चकचकीत आयुष्यात अनेक तरुणांना जन्मदातेही नकोसे होतात. मग ज्या वयोवृद्धांना कुणीच नाही, त्यांच्या आनंदाचा कोण विचार करेल? या जाणीवेतून कष्टकरी वृद्धांच्या सहलीचा उपक्रम घेण्यात आल्याचे रसिकाश्रय संस्थेचे महेश पवार यांनी सांगितले.


0000



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi