*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*꧁ मराठी एक गंमत ꧂*
*❀ शब्द एक, अर्थ अनेक ❀*
*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*
*_संकलन : मिलिंद पंडित, कल्याण_*
मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला. मग मराठीचा गंध कसा असणार? थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले. तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता, लाव/लावणे.
मी तिला म्हटलं, "अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू? एका शब्दाचा अर्थ काहीही असू शकेल?"
तिला कळेना !
"ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज" ती म्हणाली.
तिला वाटलं, असतील दोन तीन अर्थ. पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या *लावालावी* तच घालवू.
"हे बघ, तू मराठीचा क्लास *लावला* आहेस !"
"ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास" लगेच वहीत क्लास *लावणे* = जॉइंन असं लिहिलं.
"क्लासला येताना तू आरशा समोर काय तयारी केलीस? पावडर *लावलीस*?"
"ओ येस !"
"आपण पार्टीला, फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू, टिकली *लावतो* ?"
"येस, आय अंडरस्टँड, टु अप्लाय." तिनं लिहिलं. "पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंड ही *लावतो* तिथे तो अर्थ होत नाही".
"ओके, वी पुट ऑन दॅट !"
"आता बघ. मी चहाचा कप तोंडाला *लावला* आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड *लावलं* !"
"आपण बाळाच्या गालाला हात *लावतो*, इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच् !"
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, "हां, तुम्ही पार्क मधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी, फुलांना हात *लावू* नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय *लावू* नको. सो टु टच्"
"मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार *लाव*. मीन्स शट् द डोअर"
"हो! दार *लाव* किंवा दार बंद कर म्हणजे तेच".
"मीन्स लाव, बंद कर सेम. पण मग तुम्ही दिवा *लावते* म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर."
"बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत *लाव* = शट् = बंद कर. पण दिवा *लाव* = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं, "वाक्य लिहून आण बाई. संदर्भ नि रेफरन्स शिवाय नुसता *लाव* कसा समजणार?"
"आणखी खूप ठिकाणी *लावणे* हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत."
"नो, नो. प्लीज टेल मी मोअर". म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
"बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टीव्ही, रेडिओ इ. *लावतो* तेव्हा 'स्विच ऑन' करतो. पण देवा समोर नीरांजन, उदबत्ती, समई लावतो तेव्हा काय करतो? 'लाइट ऑन' पेटवतो, फटाके *लावतो*, आग *लावतो*, गॅस *लावतो* = पेटवतो" ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. "बघ, मी कुकर *लावलाय*" दोघी हसलो. "आधीचा कुठला अर्थ आहे का यात?"
"खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द *लावलाय*. आंघोळीचं पाणी *लावलंय* मधे असंच."
"मी रोज सकाळी अलार्म *लावते*" ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. "ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट."
"सो कनक्लूजन? एव्हरी *लाव* इज डिफरंट."
जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, "थांब गं आजी ! मी हे *लावतोय* ना!"
"हे, लुक. तो *लावतोय* = ही इज अरेंजिंग द पीसेस, टु अरेंज".
"तो शहाणा आहे. वह्या नि पुस्तकं कपाटात नीट *लावून* ठेवतो. कपाट छान *लावलेलं* असतं त्याचं".
वहीत लिहून घेऊन ती उठली, 'गुड बॉय' असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली. पण माझं विचारचक्र चालूच राहिलं. आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर *लाव, लावते, लावले* हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन *लावतो*.
बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, "ए, काय *लावलंय* मगा पासून?"
आजीने कवळी *लावली* = फिक्स केली आणि आजी कवळी *लावते* म्हणजे रोज वापरते. (यूज)
पट्टा *लाव* = बांध. बकल, बटन *लाव* = अडकव.
बिया *लावणे*, झाडे *लावणे* = पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले (एम्प्लॉइड).
वजन ढकलणारा, ओढणारा नेट/जोर *लावतो* (अप्लाइज स्ट्रेंग्थ). आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव *लावतो* म्हणजे काय करतो?
सुंदर गोष्ट मनाला वेड *लावते* या शब्दांच्या खेळानंही मला वेड *लावलं*.
इतक्यात आमची बाई आली. आल्या आल्याच म्हणाली, "विचारलं काहो सायबांना?' (मुलाच्या नोकरी बद्दल).
"विचारलं की, पाठव म्हणाले उद्या !"
"हा, मंग देते त्याला *लावून* उद्या" (ओहो! लावून देते = पाठवतो)
आणि *लावालावी* मधे तर कोण, कुठे काय *लावेल* !
अशी आपली ही मायमराठी ! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर !
"आता, हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर *लाव*" घरच्यांनी सल्ला दिला.
"आणि नाही *लावलं* तर मनाला *लावून* घेऊ नको" अशी चेष्टाही केली.
मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
No comments:
Post a Comment