*_पश्चिम आकाशातील खेळ_*
*20 फेब्रुवारी 2023*
सध्या पश्चिम आकाशात एक सुंदर खगोलीय खेळ रंगला आहे.
सूर्यास्तानंतर अतीशय तेजस्वी *_शुक्र_* सहज लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या वरच काही अंतरावर *_गुरू_* पण लगेच दिसतोय. खर म्हणजे शुक्र एवढा तेजस्वी आहे की तो सूर्य आकाशात असतानाही दिसतो. थोडा प्रयत्न करून शोधला तर एक वेगळा आनंद मिळेल. शुक्र आपल्या आकाशातील सूर्य, चंद्र यांच्या खालोखाल तेजस्वी असणारा ग्रह आहे.
उद्या म्हणजे 21 फेब्रुवारी 2023 ला सूर्यास्तानंतर लगेच पश्चिम क्षितिजावर फाल्गुन महिन्याची प्रतिपदेची सुंदर कोर दर्शन देईल. ती सुद्धा सूर्यास्तानंतर लगेचच शोधायचा प्रयत्न करा. ती सापडली तर तो आनंद अवर्णनीय असतो.
22 फेब्रुवारीला चंद्र - शुक्र युती आहे. म्हणजे ते अगदी जवळ जवळ असतील.
23 फेब्रुवारीला चंद्र गुरुच्या दिशेने सरकेल आणि त्याच्याबरोबर युती करेल. खरतर ही विधान युती आहे पण आपल्या इथून ती युती दिसेल.
24,25,26,27 फेब्रुवारी या काळात मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण निश्चित सूर्यास्तानंतर गुरु, शुक्र पहाणार. कारण त्यांच्यातलं अंतर रोज कमी कमी होत जाईल. ते दृश्य पहाण्याचे टाळणे केवळ अशक्य ठरेल.
या काळात चंद्र शुक्र, गुरू या दोघांना मागे टाकून मंगळाच्या दिशेने सरकलेला असेल.
28 फेब्रुवारीला विज्ञान दिन आहे. याच दिवशी चंद्र मंगळ पिधान युती आहे. म्हणजे मंगळ चंद्राच्या मागे काही काळाकरता झाकला जाईल. पण भारतातून ही पिधान युती दिसणार नाही. चंद्र मंगळ फक्त युती दिसेल.
1,2 मार्च 2023 या संध्याकाळी संपूर्ण जगातले अनेक लोक गुरु शुक्र युती अनुभवत असतील. हे अतिशय दुर्मिळ दृश्य असेल. कारण यानंतर असे दृश्य 2047 मध्ये म्हणजे 24 वर्षांनी अनुभवता येईल.
त्यामुळे या दुर्मिळ घटनांचा आनंद घ्या.
* - * -* - * -* - * -* - *
या सगळ्या घटना एकत्रितपणे पुढे देतो आहे. त्यांचा आनंद जरूर घ्या.
21 फेब्रुवारी 2023 - फाल्गुन शुद्ध प्रतिपदा चंद्र दर्शन
22 फेब्रुवारी 2023 - चंद्र - शुक्र युती
23 फेब्रुवारी 2023 - चंद्र - गुरू पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)
28 फेब्रुवारी 2023 - चंद्र - मंगळ पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)
1,2 मार्च 2023 - शुक्र - गुरू युती
*राम जोशी, खगोलवेध, अलिबाग*
No comments:
Post a Comment