लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे
राजकारण - समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि. 3 :- “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी - चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.
००००
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला
- मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 3 : “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो”, असे श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment