शिक्षणात मराठी भाषेचा वापर वाढविणार
- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 5 :- राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तांत्रिक विषयांचे मराठीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
वरळी येथे आयोजित मराठी विश्व संमेलनात शुभेच्छा देतांना ते बोलत होते.
विश्व मराठी संमेलनाच्या भारदस्त आयोजनासाठी मराठी भाषा विभागाचे अभिनंदन करून मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रभावी पाऊले उचलत आहे. शासकीय कामकाज मराठीतूनच व्हावे असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे संशोधनासारखा विषय मातृभाषेतून शिकविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विधी विषयक कामकाज मराठीतून व्हावे यासाठी कायदेविषयक शिक्षण मराठी भाषेतून देण्यात येणार आहे.
मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. आयआयटी मुंबईने यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करून दिले आहे. या माध्यमातून इंग्रजी मधील पुस्तकं पूर्णतः मराठीतून वाचता येणार आहे. तसेच कोणत्याही भाषेतून मराठी विषय शिकविला गेला तरी त्याचा अभ्यास मराठीतून करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यायी सोपे शब्द शोधून त्यांना दैनंदिन वापरात प्रस्थापित करण्याची आवश्यकता श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
००००l
विश्व मराठी संमेलन :मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 5 : मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मना मनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, झी 24 तास या वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे, साम टीव्ही मराठीचे प्रसन्न जोशी, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे संपादक अभिजित कांबळे, निवेदक अजित चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेने जन्माला घातलेली विरासत ही जगातील दहा प्रमुख विरसतींपैकी एक आहे.विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषा सर्वंदूर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. यनिमित्ताने मराठी भाषेचे महत्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी सांगितले.
विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष कौतुक श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या सह विविध देशातील मराठी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि उद्योग विभाग यांच्या सहकार्याने आयोजित विश्व मराठी संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे.
०००
No comments:
Post a Comment