*पु.ल. आणि वारा*
*पुलंचा हजरजबाबीपणा, उस्फुर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…*
१९६०-६१ आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती..त्यातील संवाद पाहा:
वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे हे खरं आहे काय?
पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”
“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”
“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”
“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”
“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”
“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”
“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”
“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”
“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”
“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!
“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”
“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!
No comments:
Post a Comment