शेतीच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती कळण्यासाठी लवकरच ई पंचनामे
- शंभूराज देसाई.
नागपूर, दि. २७ : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, सततचा पाऊस आदी कारणांमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती कळावी यासाठी यापुढे डिजिटल माध्यमाचा उपयोग करून ई पंचनामे करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांना निकषापेक्षा अधिक मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य दीपक चव्हाण यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित लाभ देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येईल. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सहा हजार ४१७ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार ५५० कोटी रुपये वितरित झाले असून उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पाच कोटी ५८ लाख रुपये निधी प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित १७ कोटी निधीही मिळणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. देसाई यांनी दिली.
या लक्षवेधी सूचने वरील चर्चेत सदस्य नाना पटोले यांनी सहभाग घेतला.
000
No comments:
Post a Comment