नॅशनल ॲवॉर्डसाठी प्रस्ताव सादर करावे
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन.
मुंबई, दि. 11 : नागरिकांमध्ये मतदानाबाबत शिक्षण आणि जाणिव जागृती करण्यासाठी काम करणाऱ्या माध्यम संस्थांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी माध्यम संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
चार गटांसाठी हे पुरस्कार आहेत. प्रिंट मिडिया, टेलिव्हिजन, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) सोशल मीडियासाठी हे पुरस्कार आहेत. प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजेच दि. 25 जानेवारी रोजी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुरस्काराची निवड मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची गुणवत्ता, उपाययोजनांची वारंवारता, उपाययोजनांचा मतदारांवर झालेला परिणाम, निवडणुकीच्या सुलभतेबाबतची प्रसिद्धी आणि इतर अनुषंगिक उपाययोजना या मुद्यावर निवड केली जाईल, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी यांनी यावेळी दिली.
पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठीच्या अटी आणि नियम याबाबतची माहिती भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. यासाठी अर्ज श्री. लव कुश यादव, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली-110001, या पत्त्यावर, media-division@eci.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.011-23052033 यावर संपर्क साधावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment