Monday, 28 November 2022

अभियंत्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक -

 अभियंत्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई दि. 28 : देशाच्या, राज्याच्या विकासात अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.


           यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास संघटनेचे मुख्य सल्लागार सुभाष चांदसुरे, संघटनेचे अध्यक्ष सुरेश नलावडे, अशोक ससाणे आदी उपस्थित होते.


            मंत्री चव्हाण म्हणाले, “जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याचा आपला कायम प्रयत्न असला पाहिजे. आपल्या मागण्याबाबत शासनाची सहकार्याची भूमिका असेल”.


     यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संघटनेच्या स्मरणिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष चांदसुरे यांनी केले तर आभार अशोक ससाणे यांनी मानले. सूत्रसंचालन श्याम मिसाळ यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi