Thursday, 1 December 2022

शिवप्रताप दिन सोहळा

 शिवप्रताप दिन सोहळा

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव.

            सातारा दि. 30 : शिवकालीन धाडसी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवकालीन गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भवानी मातेची मनोभावे आरती केली. छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आजही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेशद्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल.

            राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            शिवप्रताप दिनाला महत्त्व असल्याचे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले

            किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठया उत्साहात करण्यात येईल असे पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

            आज सकाळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.

            भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

            यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री महादेव जानकर, भरत गोगावले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000


 



 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi