ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी ‘उमेद’ अभियान प्रभावी
- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
राज्यातील 38 हजार गावांमध्ये अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.
मुंबई दि. 30 : 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
माटुंगा येथे षण्मुखानंद सभागृहात आयोजित 'उमेद' महिला सक्षमीकरण विशेष कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असून समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी गरिब, विधवा, निराधार महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील महिला बचतगटाच्या सक्षमीकरणासाठी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री, व्यवस्थापन, पॅकिंग तसेच मार्केटिंग करण्यावर भर देण्यात यावा. या मालाच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात शहरालगत मोठे संकुल (मॉल) उभारून विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील जवळपास ३८ हजार गावांमधील ५५ लाख कुटुंबे या अभियानात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून ५ लक्ष ८४ हजार स्वयं सहाय्यता गटांची निर्मिती झाली आहे. १० हजार उत्पादन गट तयार करण्यात आले असून ४५ शेतकरी उत्पादक गट तयार करण्यात आले आहेत. जवळपास १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज बँकांच्या माध्यमातून तसेच अभियानाअंतर्गत ११ कोटी रुपयांचा निधीचे वाटप स्वयं सहाय्यता गटांना करण्यात आले आहे. आगामी काळात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी आश्वस्त केले.
ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याच्या ग्रामीण आर्थिक विकासात ‘उमेद’ अभियान महत्त्वाची भूमिका निभावत असून अभियानातील सहभागी कुटुंबाचे किमान १ लाख वार्षिक उत्पन्न करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘उमेद’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी केले. अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला आमदार कॅ. आर. तमिल सेल्वन, अपर मुख्य सचिव राजेश कुमार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, राज्यातील महिला बचतगटांच्या प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment