Saturday, 15 October 2022

भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे

 भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

       मुंबईदि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

          भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकरमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमहारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

       महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा रोड ते भंडारा शहर यादरम्यान अस्तित्वातील ११ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Feasibility Study Report) सादर केला आहे.

नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्स ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानकूलित बी. जी. (Broad Gauge) मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

       हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने केला आहे.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi