दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी धडक कार्यवाही करावी
- अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. १८ : दिवाळी सण जवळ आला असून अन्नपदार्थ, मिठाई, विविध मसाले, तेल, तूप यासह अनेक खाद्यपदार्थ खरेदीसाठी नागरिकांची दुकानात गर्दी होत असते. तसेच अनेक नागरिकांकडून या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीही येत असतात. या तक्रारींची दखल घेत अशा उत्पादक, वितरण व विक्रेते यांची सखोल तपासणी करण्यासह संशयास्पद आणि तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या अन्न पदार्थ आणि औषधांचे नमुने तपासणीसाठी धडक मोहिम राबवावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.
औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 मधील कलम 9 ड (अ) व त्याखालील शासनाने केलेले नियम, अधिसूचना यांच्यामधील तरतूदी पाहता राज्यामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधने ही नामांकित ब्रॅंडची नक्कल करुन बाजारात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. यामध्ये सौंदर्यप्रसाधनामधील रंग, लेबलींग, चुकीचे दावे, तसेच कलम 9 ड (अ) व (ब) मधील तरतुदीनुसार दुसऱ्या सौदर्यप्रसाधनाची नक्कल करणे अशा पद्धतीने केलेले पॅकेजिंग व लेबलिंग करणे, अस्तित्वात नसलेल्या कंपनीचे नाव टाकणे यासारखे प्रकार घडत आहेत. असे प्रकार हे गंभीर स्वरुपाचे असून त्याबाबत विभागाने धडक मोहिम राबवावी, असे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.
मुंबईमध्ये मनिष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, अल्फा व्हिलेज, विलेपार्ले, तर ठाणे मधील उल्हासनगर इत्यादी ठिकाणी तक्रारदार अशा दुकानदार आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत अधिक आग्रही आहेत. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरण व विक्रेते यांची सखोल तपासणी करण्यासह संशयास्पद/ आणि तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या अन्न पदार्थ आणि औषधांचे नमुने घेऊन धडक मोहिम राबवावी, अशा सूचना त्यांनी विभागाच्या आयुक्तांना दिल्या आहेत. तथापि, अशी कार्यवाही करताना कायद्याचे पालन करणाऱ्या वितरक आणि विक्रेते यांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजीही घ्यावी, असे मंत्री श्री. राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
***
No comments:
Post a Comment