महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायाचे उत्साहात आगमन.
नवी दिल्ली, दि. 31 : ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने कोपर्निकस मार्ग व येथील महाराष्ट्र सदन निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांची एकच गर्दी जमली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व परिक्षेत्रात दिसून आले.
महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.
महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास 30 मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.
गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितीक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
000000
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली पूजा.
मुंबई, दि. 31 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.
यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
.......
No comments:
Post a Comment