Thursday, 7 July 2022

 अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नव्याने लावलेल्या 5% जीएसटीला ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चा तीव्र विरोध


केंद्रीय अर्थमंत्री व जीएसटी काऊन्सील कडे दाद मागणार

राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी.

मुंबई ः जीएसटी काऊन्सील च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ब्रँडेड नसलेल्या व पॅकींग पुर्व अन्नधान्य व खाद्यपदार्थावर 5% जीएसटी लावण्याचा घेतलेला निर्णय सामान्य जनतेवर महागाईचा बोजा लादणारा निर्णय असुन या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर या राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्थेने घेतला असल्याची माहीती चेंबर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

2017 साली जीएसटी करप्रणाली लागु करताना अन्नधान्यावर जीएसटी लावणार नाही असे आश्‍वासन दिले होते. नंतरच्या काळात ब्रँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थावर जीएसटी लावला, आणि आता तर नॉन ब्रँडेड अन्नधान्य व खाद्यपदार्थावर 5% जीएसटी लावण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा व अन्यायकारी असल्याचे सांगुन ललित गांधी पुढे म्हणाले की, आधीच महागाईने सामान्य माणुस बेजार झाला आहे. त्यात 5% जीएसटी चा मार हा सामान्य लोकांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे.

अन्नधान्याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर, ताक, चिरमुरे, गुळ, पापड यासारख्या वस्तुंवर कर लावून सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम केले जाणार आहे. त्या बरोबरच छोटे व्यापारी मोडीत निघणार असुन फक्त मोठ्या ब्रँडेड कंपन्यांचा व्यापार वाढणार आहे.

गेल्या शंभरवर्षापासुन महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन कार्यरत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर तर्फे या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन केंद्रीय अर्थमंत्री, जीएसटी काऊन्सील कडे याचा विरोध नोंदविण्यात आला असुन लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेउन व्यापारी, अडत मार्केट व सामान्य ग्राहकांच्या अडचणी मांडण्यात येतील तसेच जीएसटी काऊन्सील च्या सर्व सदस्य अर्थमंत्रालयांनाही याबाबत निवेदन देणार असल्याचे सांगुन ललित गांधी पुढे म्हणाले की, याबाबत सरकारने तात्काळ स्थगिती न दिल्यास राज्यभर याविरूध्द आंदोलन करण्याची तयारी केली असुन त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 11 जुलै 2022 रोजी दुपारी 3ः00 वा. महाराष्ट्र चेंबरच्या काला घोडा, फोर्ट, मुंबई येथील मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केल्याची माहीतीही ललित गांधी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi