सोडून द्यायला शिका !!
आज सकाळची गोष्ट आहे, नित्यनेमा प्रमाणे मी प्राजक्ताच्या झाडाच्या बाजूला ध्यानात बसलो. पण आज काही ध्यानात मन लागत नव्हते.
भविष्यात सर्व कसे होणार याबद्दल काहीशी चिंता मनात घर करत होती. तो विचार कसाबसा गेला की, भूतकाळातील त्रागे, वेदनादायक क्षण आठवत होते. अश्याने डोक जड पडायला लागले. नैराश्य, विचारांचे वादळ उठायच्या आत मी डोळे उघडले.
समोर प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायला सुरूवात झाली होती, बरीच फुले खाली पडली होती. मी ते पहातच राहिलो, झाडाला कळ्या लागल्या, कळ्यांचे फुले झाले. आणी प्राजक्ताच्या झाडाने आपली फुले कोमेजून जायच्या अगोदर सोडून द्यायला सुरूवात केली. संपुर्ण फुलांचा सडा जमिनीवर पडला होता.
प्राजक्ताचे झाड आपल्या फुलांमध्ये अडकून राहीले नाही, कदाचीत त्याला समजले असेल की रात्री परत कळ्यांची फुले होतील आणी पुन्हा सुगंधाची बहार येईल. या विचाराने ते आजचा दिवस आनंदाने आणी भरभरून जगले असेल.
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. निसर्ग आपल्याला पावलोपावली बदलाची अनुभूती करून देत असतो. तो आपल्याला क्षणोक्षणी सोडून द्यायला सांगतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, आपण ते स्वीकारत नाही.
माझ्या मनात उठलेल्या भविष्याच्या विचारांचे आणी भूतकाळाच्या आठवणींचे काहूर कसे शांत करायचे याचे उत्तर मला प्राजक्ताच्या झाडाने आणी फुलांनी दिले होते. किती सोप करून मला सांगितल होत.
भूतकाळातील चांगल्या वाईट अनुभवांचे ओझे आणी भविष्याची चिंता सोडून देणंच तुमच्या आजच्या आनंदाचा मार्ग प्रशस्त करतो, या प्राजक्ताच्या झाडाने मला हे परत आठवण करून दिले. असे केल्यानेच आजचा दिवस आनंदात, समाधानात आणी भरभरून जगता येईल हेच खरे आहे.
मृत्यू कोणत्याही क्षणी आपल्याला गाठू शकते हे तर सर्वमान्य सत्य आहे. आजचा दिवसही आपल्या हातून निसटत चालला आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असूदे, आपण सर्व राग, द्वेष, अहंकार, उद्याची चिंता, भूतकाळाचे ओझे सोडून, आजचा दिवस, आताचा क्षण भरभरून जगायला हवा, सकारात्मक रहायला हवे, कारण हा दिवस आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आपण उद्या असू की नाही कुणालाच माहित नाही.
आपल्या हाती फक्त एकच मंत्र .....
।। सोडून द्यायला शिका।।
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment