*एका भारतीय संगीतकाराने इतिहास घडवणाऱ्या या पक्षांच्या गाण्याची खरी गोष्ट नक्कीच वाचा.*
*आज जगात व्हायरल झालेले हे ७२ पक्ष्यांचे गाणं ऐका. आणि आनंद घ्या निसर्ग संगीताचा.....*
*सोनेरी गाणं - 1*
*ऋषीतुल्य जेष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित माचीवरला बुधा* या चित्रपटाच्या वेळी *जेष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ* यांना स्वतःलाही माहीत नव्हत की या चित्रपटातलं एक *संस्मरणीय , विश्वविक्रमी गीत संगीतबद्ध होण्यासाठी त्यांची वाट पहातयं.* याचं कारण असं की तब्बल ४० संगीतकारांनी नाकारलेलं गाणं आता प्रत्यक्षात कधी येणारच नाही अशी हळहळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटायला लागलेली असतानाच *हे गाणं धनंजयजींच्या वाट्याला आलं आणि गाण्याचं अक्षरशः सोनं झालं.*
झालं असं की , या चित्रपटाचे *दिग्दर्शक - विजय दत्त आणि पटकथा , संवाद लेखक - प्रताप गंगावणे* एकदा बोलत होते. आपल्या चित्रपटात वेगळं काय बरं करता येईल असा विचार सुरू असतानाच अचानक , या चित्रपटात *केवळ पक्षांचेच आवाज वापरून एक गाणं करायचं ही कल्पना प्रतापजींना सुचली.* कोणतंही वाद्य नको , कोणताही आवाज नको , फक्त पक्षांचेच आवाज असतील असं गाणं हवं असं ठरलं. पण हे गाण करायला कुणीही पुढे येईना. सिनेइंडस्ट्रीतील लहानमोठे तब्बल चाळीस संगीतकार गाठले पण कुणीही हे आव्हान पेलण्याची तयारी दाखवली नाही. कुणी म्हणे, आम्ही तोंडाने आवाज काढू , कोणी म्हणे वाद्यावर आवाज काढू पण वाद्याशिवाय , आवाजाशिवाय , केवऴ पक्षांच्याच आवाजत गाणं करायचं ही कल्पनाच पचणारी नव्हती. आणि दुसरीकडे , केवळ नैसर्गिक आवाजांनी बद्ध असलेलं गाणंच हवं असा जणू दिग्दर्शकांनी ( विजयदत्तजींनी ) हट्टच धरला होता. अशावेळी कसं कोण जाणे , प्रतापजींना एकदम धनंजयजींचच नाव सुचलं आणि लगोलग त्यांना निरोप धाडला गेला. मुंबईला दादरला शिवाजी पार्कजवळ भेट झाली.
पक्षी आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज घेऊन गाणं बनवायचंय तुम्ही बनवू शकाल का .. असा प्रश्न समोरून येताच , धनंजयजींनी क्षणार्धात हे आव्हान घेतलं.. धनंजयजींचा आत्मविश्वास बघून खूश होऊन तत्क्षणी दिग्दर्शकांनी आपल्या खिशातले पाच हजार रूपये काढून बक्षीस म्हणून धनंजयजींच्या हातावर ठेवले आणि कामाचा श्रीगणेशा झाला.
मग सुरू झाला धनंजयजींचा प्रवास , अगदी झपाटल्यागत.. आव्हान घ्यायचं आणि ते पेलूनच यशस्वी व्हायचं हा स्वभाव असलेल्या धनंजयजींनी *दिग्दर्शक विजयदत्तजींना* सोबत घेऊन दोन तीनदा जंगलाची सैर केली. केवळ पक्षांचेच आवाज ऐकायचे , आणि निसर्गातल्या अन्य आवाजांचा सतत कानोसा घेत जायचं , पक्ष्यांच्या गुजगोष्टींना ताल लयीत मांडायचे कसे हाच विचार ... त्यासाठी जंगलं जंगलं पायाखाली तुडवली. लोणावळा , अर्नाळा , त्र्यंबकेश्वर , सातारा सगळीकडली जंगलं पालथी घालता घालताच तिथले आवाज , ऐकू येतील ते ते निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ते ध्वनिमुद्रीत करावे अशी कल्पना सुचली आणि आपले मोठे बंधू ध्वनीमुद्रक *गोरखनाथ धुमाळ* यांना घेऊन जंगला जंगलात फिरून आवाजांचं ध्वनीमुद्रण केलं. तब्बल
१९००० कि.मी. चा प्रवास करत , सहा महिने , रात्री बेरात्री, उन्हा पावसाची पर्वा न करता , पक्ष्यांचे आवाज गोळा करता करता सुमारे २० ते २५ जीबीचा डाटा गोळा झाला. एवढ्या प्रचंड माहितीतून नेमकी माहिती हेरायची , नेमके आवाज हेरायचे , त्यांचाच उपयोग करून गाणं बनवायचं... सोपी गोष्ट नव्हतीच मुळी , अजिबातच ... पण ते हरले नाहीत.. पुढला आठवडाभर या आवाजांचाच ध्यास घेतल्यागत दिवसरात्र तेच ते आवाज ऐकत राहिले. पक्ष्यांच्या आवाजासह मनातलं संगीत शोधत राहिले.
दोन आठवडे लोटले... अन् एका जादूई क्षणी बुलबुल , सुतार , खंड्या , कावळा , चिमणी , करकोचे , बदक , कोकीळ अशा तब्बल ७२ पक्षांच्या आवाजासह मनातलं गाणं प्रत्यक्षात आलं.
जगाच्या पाठीवरलं पहिलं असं गाणं, ज्यात कोणतंही वाद्य नाही , कोणतेही मानवनिर्मित आवाज नाहीत , कोणाही व्यक्तीचा आवाज नाही ... आहेत ते केवळ नैसर्गिक आवाज , पक्षांचे आवाज.. आणि या गाण्याचे जन्मदाते , माझ्या नाशिकचे , थोर , जेष्ठ संगीतकार -
पं. धनंजयजी धुमाळ ( सर )
- मोहिनी घारापुरे - देशमुख
पत्रकार, नागपूर
संकलन : शरद मगदूम
*अबकड कल्चरल ग्रुप, सांगली*
🪀 *94226 22626*
No comments:
Post a Comment