रखुमाई ने केलेली कविता
दोन वर्षांनंतर पुन्हा, आनंदात दिसतीए स्वारी
ज्ञानोबा तुकोबा घोषाने, सुरू झालीये वारी
दोन वर्ष सुने होते, पंढरपूरचे अंगण
यावर्षी सुरू झाले, हरिपाठ नी रिंगण
खर सांगू?
खर सांगू दोन वर्ष, हे मंदिरात नव्हते
तुमच्यासोबत ते सुद्धा, एक लढाई लढत होते
मी म्हटलं ना मग करा चमत्कार,
सोडा ना हात कटावरचे
अहो तुम्ही देव आहात,
फिरवा ना फासे पटावरचे
देवच तो..
म्हणाला हीच तर वेळ आहे, खरा देव ओळखण्याची
माणसाने माणसाला माणूस म्हणून जपण्याची
सरले संकट तेंव्हा कुठे, हे पंढरीत परत आले..
म्हणाले जगाचे संकट, संयमाने सरत आले..
पुन्हा वाजला मृदुंग, झंकारली एकतारी
रखुमाई अग पाहतेस का सुरू झाली वारी
वारकऱ्यांच्या प्रेमासाठी देव पुन्हा विटेवर उभा राहिला..
माणसातील देव पाहतोच, मी देवातील माणूस पाहिला..
चेहऱ्यावर टिळा, हातात टाळ, बेचैनी सरली सारी
ज्ञानोबा तुकोबा नामाच्या घोषात, सुरू झालीये वारी
No comments:
Post a Comment