Thursday, 5 May 2022


 कोंढाणे प्रकल्पाच्या कामास सिडकोने गती द्यावी

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

            मुंबई दि ५ :कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामास शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) गती द्यावी. नजीकच्या गावातील पिण्याच्या पाण्याची पूर्तता करावी. तसेच २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.

             रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.पाटील यांनी वरील सूचना दिल्या. या बैठकीस खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, सुरेश लाड, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आदिसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, नजीकच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. कोंढाणे धरण प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना १० दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा तसेच, भूभागाचे सर्वेक्षण करताना स्थानिक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने प्रकल्पाचे काम सिडकोने करावे, असे सांगितले.

            या प्रकल्पाअंतर्गत ज्यांना भू भाडे द्यावयाचे आहेत,अशांना मोबदला देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीत केली.

००००


 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi