अर्थक्षेत्राला कृषीक्षेत्रामुळे लाभली स्थिरता
- उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या संकटकाळात सर्वच क्षेत्रांचे अस्थिरतेचे सावट असताना कृषी क्षेत्राचे नुकासान मर्यादित राहिले, त्यामुळे सर्वच क्षेत्रांची व्यवस्था कोलमडत असताना कृषीक्षेत्राने अर्थक्षेत्राला स्थिरता दिली. शेती आणि श्रमाची प्रतिष्ठा पुन्हा वाढली असून ती भविष्यातही अशीच वाढत राहील. शासनाने कर्जमुक्ती केली. टप्याटप्याने भविष्यात प्रोत्साहनपर योजनांचाही विचार आहे. परंतु सर्व सोंगं आणता येतात पैशांचे आणता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आता स्वत:ला आर्थिक शिस्त लावायला हवी. 10 टक्के व्याजदराने सावकारी कर्ज घेण्यापेक्षा शुन्य टक्के व्याजदराने कर्ज घेवून सरकारी योजनांची लाभ घ्यायला हवा. जे विकेल तेच पिकवायला हवे. पूर्वी दुसऱ्या देशातून शेतीमालाची आयात आपण करत होतो आज आपण स्वयंपूर्ण आहोत. आपल्या शेतीमालाला आता परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी होतेय. असे सांगून ते म्हणाले, कमी वेळेत कमी पाण्यावर, रोगाला बळी न पडणारे वाण आता आपण विकसित करायला हवे. त्यासाठी राज्यातील 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांना 50 कोटी संशोधनासाठी शासनामार्फत दिले जाणार आहेत.
शेती शाश्वत होण्यासाठी पुरक व्यवसाय करण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपण उत्पादित करत असलेले धान्य हे रसायनमुक्त असायला हवे, त्यासाठी लक्ष द्यावे लागेल. सेंद्रिय औषधांची निर्मितीसाठी संशोधन व त्याचा वापरही आपल्याला वाढवावा लागेल. ऊसाची शेती किफायतशीर होण्यासाठी शेतातील ऊस संपेपर्यंत कारखाने चालू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला असून कारखान्यांना त्यासाठी किलोमीटरप्रमाणे सबसिडी दिली जाणार आहे. तसेच मदत म्हणून 200 टनापर्यंत रिकव्हरी लॉस ची योजना आणली आहे. येणाऱ्या काळात साखर कारखाने चालवायचे असतील तर इथेनॉल निर्मितीशिवाय पर्याय नसल्याचे सांगून कोळश्याच्या संकटामुळे भारनियमन टाळण्यासाठी सोलर उर्जेचा अंगिकार आपण करावसास हवा. पुण्यात लवकरच अत्याधुनिक सेवा सुविधांनीयुक्त कृषी भवनच्या जुन्या इमारतीची नवनिर्मिती केली जाणार असून त्यामध्यमातून शेती, मातीची दैनंदिन अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शेतकरी जगला तर राज्य जगेल तो मोडला सर्वच मोडेल म्हणून शेतकऱ्यांसाठी शासन मागे होणार नाही, असा विश्वासही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपटीने वाढ
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनांचा धागा पकडत राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये पाचपटीने वाढ करण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली, ते म्हणाले तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी 51 लाखांची तरतूद करावी लागली परंतु यापुढे या पुरस्कारासाठी पाचपट वाढीव तरतूद केली जाईल. तसेच मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून शेतीच्या मुल्यवर्धनावरही भर दिला जाईल. शेतीच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यावर शासनाचा भर आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना थेट बांधावर उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी तारली अर्थव्यवस्था : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतीला धर्म मानून तिच्यातील विविधता जपण्याचे काम शेतकरी अविरतपणे करत असतो. शेतकरी खऱ्या अर्थाने देशाचा व राज्याचा कणा असुन कोरोनाकाळत राज्याची अर्थव्यवस्था तारण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
आपल्या शेतात कोणते पीक घ्यावे, लागवडी खाली असलेल्या क्षेत्राची माहिती घेवून भविष्यात पिकांचे नियोजन करणे, स्वत:च्या पिकांची नोंदणी स्वत: करणे हे शेतकऱ्यांना ई-पीक पद्धतीमुळे सहज शक्य होत आहे. या ई-पीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडून येतील. शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा पुरवून त्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही महसूल मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही राज्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला पुरविण्याचे काम सातत्याने केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment