Monday, 2 May 2022

 दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा.

नवी दिल्ली,१: महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आज महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भुपाळी, वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, भारूड, गौवळण, लावणी, कोळीनृत्य आदि समृध्द लोककलांच्या दमदार सादरीकरणाने राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

      कस्तुरबागांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेटहॉल मध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरुपमा डांगे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार उपस्थित होते.

     महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही महाराष्ट्र दिनाच्या औचीत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारस्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने कोल्हापूर येथील श्रीजा लोककला संस्थेच्या कलाकारांच्या चमुने यावेळी दमदार सादरीकरण केले.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

            भुपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. मंगळागौरी सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीचे विविध गाणे गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगीतांचे सादरीकरणही झाले. वारकरी संताचे प्रसिध्द भारूडही यावेळी सादर झाले. 

            लावणी, गौवळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

        राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळया मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.               

00                                                              

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.

मुंबई, दि.१: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अॅड अनिल परब, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, अभिनेते आदेश बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

            छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याची कायमस्वरूपी प्रतिकृतीचे उदघाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे ही कायमस्वरूपी गड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे याच प्रतिकृतीच्या मागे मुंबा आईची प्रतिकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आल्यानंतर प्रवाशांना मुंबा आईचे दर्शन होणार आहे.


000000


 


                                                                           वृत्त 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi