जिल्हा परिषद शाळांच्या थकीत वीजबिलांसाठी निधी वितरित
- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड.
मुंबई, दि. ७ : राज्यातील १० हजार ६७१ जिल्हा परिषद शाळांचे थकीत वीज बिल अदा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस ५ कोटी ८८ लाख ६३ हजार रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दोन हजार ६५७ जि. प. शाळांची एकूण तीन कोटी २० लाख ५९ हजार रकमेची वीज देयके अदा करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर यांनी याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४ टक्के सादील अनुदानाखालील उपलब्ध तरतुदीनुसार ५ कोटी ८८ लाख ६३ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून ४ जून २०२० च्या शासन निर्णयान्वये सादील अनुदानातून खर्च करावयाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जि. प. प्राथमिक शाळांमधील इटंरनेट जोडणी देयक, विविध डिजिटल व संगणक साहित्य आणि त्यासोबतची उपकरणे यांची देखभाल व दुरूस्ती व तसेच वीज बिल भरण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता ३४.५० कोटी इतके सादील अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यापैकी २२.५० कोटी रूपये प्राथमिक शाळांच्या किरकोळ खर्चासाठी मंजूर करण्यात आला असून त्यातून वीज देयके अदा करण्यात येतील, असेही प्रा. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment