Friday, 4 March 2022

 ऑनलाईन नोंदणी केलेल्या मात्र धान खरेदी न झालेल्या

शेतकऱ्यांकडून मागणी आल्यास मुदतवाढीचा विचार करणार

 - छगन भुजबळ

            मुंबई, दि. ४. ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, मात्र अद्याप धान खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी आल्यास मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

            गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात विधानसभा सदस्य कृष्णा गजबे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ३० सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये खरीप पणन हंगाम २०२१-२२ साठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ असा खरेदी कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र मागील हंगामाच्या तुलनेत खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये ३१ जानेवारी २०२२ अखेर गडचिरोली जिल्ह्यात १७ लाख ३६ हजार ९८३.७७ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.

            अभिकर्ता संस्थांच्या मागणीनुसार प्रथम ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत धान खरेदीस मुदतवाढ देण्यात आली. तद्नंतर मार्केटिंग फेडरेशनच्या मागणीनुसार १४ फेब्रुवारीपर्यंत आणि आदिवासी विकास महामंडळाच्या मागणीनुसार १८ फेब्रुवारीपर्यंत धान खरेदीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. मात्र अद्याप धान खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी आल्यास मुदतवाढीचा विचार करण्यात येईल, असे मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी सांगितले.

००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi