Tuesday, 11 January 2022

 विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 10 : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये इ.पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

            सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाईन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

00000



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi