सारे सारे निघून गेलेत.....
*कहीं दूर, कहीं दूर*
लता,आशा आता गात नाहीत..
भीमसेन, कुमारचे सूर हरवलेत..
शिवकुमार, हरिप्रसाद ही आता केव्हातरी..
आर डी, लक्ष्मी-प्यारे शांत झालेत..
कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाहीत..
प्राण, कादर खानची दादागिरी संपली आहे..
अमिताभही आता फाइटिंग करत नाही..
रेखा, हेमा, झीनत, सा-यांचं सौंदर्य संपून गेलंय..
अटलजींचं ओघवतं हिंदी..
बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची गर्जना..
इंदीवरच्या गाजलेल्या मैफिली..
जगजीत, मेहंदीचा दर्दभरा आवाज..
रफी, किशोरची हृदयातली साद..
मुकेशचं कारुण्य, मन्ना डेचा पहाड़ी सूर..
सारे सारे निघून गेलेत
*"कहीं दूर, कहीं दूर"*
रेश्माची तानही विरून गेली आहे..
तलतची मखमल विरून गेली आहे..
पुलंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं..
बापट, विंदा, पाडगावकरांचं कविता ऐकवणं..
शंकर पाटीलांच्या गावरान गप्पा व दमांची मिरासदारी संपलीय..
हृदयनाथ, ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली..
पल्लेदार संवादांनी जिवंत झालेला काशीनाथ घाणेकरांचा संभाजी..
कडक, शिस्तप्रिय तरीही प्रेमळ, हवासा सतिष दुभाषींचा प्राध्यापक..
आणि भक्ति बर्वेंची 'ती फुलराणी'..
नंदू भेंडेंने जिवंत केलेला
पु.लंचा 'तीन पैशाचा तमाशा'..
डॉ. आगाशेंचा 'घाशीराम कोतवाल'..
विजयाबाईंचं 'हमिदाबाईची कोठी' व 'बॅरिस्टर'..
जब्बारची 'अशी पाखरे येती' आणि 'सिंहासन'..
सिंहासनमधली लागू भटांची जुगलबंदी..
सामनामधली लागू फुलेंची आतिशबाजी..
'पुरुष' मधला राकट नाना..
चिमणराव प्रभावळकर
आणि गुंड्याभाऊ कर्वे..
'गज-या'तले आपटे..
'प्रतिभा आणि प्रतिमा'ची सुहासिनी मुळगावकर..
आकाशानंदांचा 'ज्ञानदीप',
तबस्सुमचं 'गुलशन गुलशन'..
'आवाज़ की दुनिया का दोस्त' अमीन सयानीचा दर बुधवारचा *आज पहली पायदान पर हैं*
म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज..
रविवारचा विविधभारती वरचा 'एस. कुमार का फिल्मी मुक़दमा'..
आणि रेडियो सीलोन वरचा सैगलचा समारोप स्वर..
दर एक तारखेला न चुकता लागणारं किशोरचं 'दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं' म्हणून आठवण करून देणं..
तल्यारखान, लाला अमरनाथचा कानात प्राण आणून ऐकलेला क्रिकेटचा *आँखों देखा हाल*..
आणि black and white मध्ये बघितलेली 1983 ची क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल..
कॉलेज बंक करुन पाहिलेले मिथुनचे हाऊसफुल्ल पिक्चर..
झीनतची कुर्बानी..
अमिताभ-शत्रुचा दोस्ताना..
धर्मेन्द्रचा ओरिजिनल ढाई किलो का हाथ..
जीतेन्द्र-श्रीदेवीचे आचरट विनोद..
अमजद-कादर-शक्तिकपूरची विचित्र विनोदी व्हिलनगिरी..
राजेश खन्नाचा रोमँटिक अंदाज..
थिएटरमधली वीस वीस आठवडे ओसंडणारी गर्दी,
ब्लॅकमधे टिकिट घेताना
केलेली मारामारी..
सर्व काही आता इतिहासजमा होऊन गेलं,
आठवणींच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेलं..
ऊर फाटेस्तोवर धावून
*फर्स्ट डे फर्स्ट शो* पाहणं नाही..
आता सतराशे साठ चॅनल्सवरुन चोवीस तास सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतात..
पण त्यामधे आता ती पूर्वीची हूरहूर अन् अप्रूप नाही..
खूप वेळ प्रयत्न करुन एकदाचा *तिने* उचललेला फोन नाही..
तिच्या बापाने नाहीतर भावाने फोनवरुन दिलेल्या शिव्या नाहीत..
फेसबुक, व्हाट्सएप, एस एम् एस आणि मोबाइलच्या जमान्यात टेलीफोनची गम्मत नाही..
तासनतास बिल्डिंगखाली उभं राहून वाट पाहणं नाही..
मनातलं कळवण्यासाठी
रात्र रात्र जागून पत्रं लिहिणं नाही..
सेकंदात फेसबुकवर अपडेट होण्याच्या जमान्यात पत्राची वाट पाहण्यातली आतुरता आणि मजा नाही..
हातातून निसटून गेलेल्या वाळूच्या कणांसारखं हे सारं केव्हा निसटून गेलं ओंजळीतून खरं तर कळलंही नाही..
पण आयुष्याच्या उत्तरार्धात हे सारं आठवताना खुदकन हसतो भूतकाळाच्या हिंदोळ्यावर कितीतरी काळ झुलत राहतो..
खरंच तो काळ किती सुंदर होता !
सारं काही साधं, सरळ नि सोपं होतं... यंत्र आणि माणसंसुद्धा !
आता माणसांचीच यंत्र झालीत आणि यंत्रं माणसांसारखी वागू लागलीत..
प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा हे शब्द आता फक्त शब्दकोशातच सापडतात..
तरीही जुनी मित्र मंडळी भेटली की तेवढ्यापुरते जिवंत होतात..
सारे सारे निघून गेलेत
*कहीं दूर, कहीं दूर*........
No comments:
Post a Comment