विम्यासंदर्भातील कामकाजात सुधारणा करावी - कृषिमंत्री
विमा कंपन्यांकडून पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. विम्याच्या रकमेमुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास त्या जिल्ह्यातील संबंधित विमा कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल. त्याशिवाय नुकसानभरपाई देण्याच्या निर्देशांचे पालन केले नाही तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचाही इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिला. कृषिमंत्र्यांनी सर्व विमा कंपन्यांच्या कामाचा आढावा घेऊन विम्यासंदर्भातील कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. ज्या शेतकऱ्यांचे विम्याचे प्रस्ताव अपात्र केले आहेत त्या प्रकरणांची पुन्हा पडताळणी करा, कृषिविभागाने देखील हे प्रस्ताव तपासून घेण्याबरोबरच उशिरा सर्वेक्षण केले असेल तरीही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिलेच पाहिजे असेही श्री. भुसे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट केले.
विमा कंपन्यांच्या संथ कारभारामुळे राज्य सरकारची होणारी बदनामी कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, विमा कंपन्यांनी देखील युद्ध पातळीवर कार्यवाही करुन आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश देऊन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी यावेळी केले. कृषिमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्व विमा कंपन्यांनी निश्चित झालेली नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे मान्य केले.
000000
No comments:
Post a Comment