ऑनलाईन संगणक प्रशिक्षणातील अनियमिततेबाबत
15 दिवसांच्या आत चौकशी केली जाईल
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 27 : नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कोविडकाळात मुलींना देण्यात आलेल्या ऑनलाईन संगणक प्रशिक्षणातील अनियमिततेबाबत येत्या 15 दिवसात चौकशी केली जाईल असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत सांगितले.
ऑनलाईन संगणक प्रशिक्षणातील अनियमिततेसंदर्भातील प्रश्न आज तारांकित प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य संजय सावकारे, राजेश पवार यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद सेस फंड योजना 2019-20 अंतर्गत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे ही योजना राबविण्यात येत असून या योजनेकरिता 30 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. ग्रामविकास विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थींचे प्रशिक्षण याकरिता सन 2019-20 यावर्षी मार्च 2020 मध्ये 15 लाख रुपये इतकी रक्कम अग्रिम म्हणून संबंधित संगणक प्रशिक्षण संस्थेला अदा केली तर उर्वरित 14 लाख 86 हजार रुपये इतकी रक्कम सन 2020-21 या वर्षात मार्च 2021 मध्ये अदा करण्यात आली. संगणक प्रशिक्षणाच्या दरम्यान मार्च 2020 पासून कोविडमुळे ऑफलाईन प्रशिक्षण न देता ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 714 विद्यार्थ्यांपैकी 711 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. अशी माहितीही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.
--
No comments:
Post a Comment