Friday, 26 November 2021

 बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

            मुंबई, दि. 26 : भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२१-२०२२ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून ‘मिशन कर्मयोगी लोक सेवा वितरणासाठीची क्षमता वाढवणे’ आणि ‘भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण’, यापैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठी भाषेत २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत निबंध पाठवावेत, असे आवाहन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत करण्यात आले आहे.

            निबंध तीन हजार शब्दांपेक्षा कमी आणि पाच हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंध विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहून चार प्रतीत मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग. मुंबई- ४०००३२ या पत्त्यावर पाठवावा.

            स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करू नये. निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नांव (मराठी व इंग्रजीतून टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी नमूद करून पाठवाव्यात.

            निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे चार पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत :

पहिले पारितोषिक - ७ हजार ५०० रुपये, दुसरे पारितोषिक - ६ हजार रुपये, तिसरे पारितोषिक - ३ हजार ५०० रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक २ हजार रुपये असून अधिक माहितीसाठी www.iipamrb.org.in या संकेतस्थळाला भेट द्या. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेचे कार्यकारी सहसचिव नितीन वागळे यांनी केले आहे.

00000



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi