पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या
सेवा प्रवेश नियामांमध्ये करण्यात यावा
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई, दि. 4 : पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सबाबत बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, उपसचिव सुरेद्र चानकर, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे डॉ. सुशिल दुबे, डॉ. अरुणकुमार व्यास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, सध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 13 पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) सुरु असून साधारणपणे यासाठी 2000 जागा उपलब्ध आहेत. या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती अधिक होण्याकरिता जिल्हास्तरावरील महाविद्यालयांमार्फत जास्तीत जास्त वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात यावी. पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे कोविड-19 काळात दिसून आले आहे.येणाऱ्या काळात या 13 अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुर्नरचना करणे आवश्यक आहे याबाबतचा अभ्यास करुन त्यांची पुर्नरचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी करावी. तसेच अभ्यासक्रमाच्या पाठयक्रमामध्ये आवश्यक बदल व श्रेणीवर्धनाच्या दृष्टीने अभ्यासगट म्हणून उच्च स्तरीय समिती गठीत करुन त्याची पुर्नरचना करण्यात यावी, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.
००००
महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पारदर्शक
- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुंबई, दि. 4 : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणीही दक्ष राहून करण्यात येणार आहे. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
एच एस बी सी, फोर्ट येथील महावितरण कंपनीच्या इमारतीत राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेवारांच्या शंका निरसन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे म्हणाले, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चुक झाले नसल्याचे श्री.तनपुरे यांनी स्पष्ट केले.
सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफ, राखीव जागा, आरक्षण, गुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पुर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री.तनपुरे यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment