निर्मिती संस्थांना लॉकडाऊन कालावधीतील
मूळ निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 28 : कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळ्या माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे निर्मिती संस्थांना चित्रीकरण स्थळाच्या आणि दीर्घ मुदतवाढ तत्वावरील संस्थांच्या भाड्यात दि. 15 एप्रिल 2021 ते 6 जून 2021 या कालावधीकरीता सवलत देण्यात येणार असून ही सवलत मूळ निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत असेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 158 वी बैठक ऑनलाईन पध्दतीने आज आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री.सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे आणि सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
चित्रनगरीच्या पायाभूत विकासास अनुसरुन दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधाअंतर्गत कलागारे, चित्रीकरण स्थळे विकासासाठी ईओआय (EOI) (स्वारस्य अभिव्यक्ती) कार्यवाही करण्यात येत आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुरक्षिततेसाठी करार तत्वावर सुरक्षा व्यवस्था घेण्यात यावी, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे महामंडळाची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये सन 2020-21 चे लेखे स्वीकृत करण्यात आले तसेच 95.06 लक्ष एवढा भरीव लाभांश घोषित करण्यात आला.
००००
अन्न व्यावसायिकांचे परवाने तपासणीसाठी
1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम
मुंबई, दि. 28 : अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे. तसेच जे अन्न व्यावसायिक परवाना घेण्यासाठी पात्र आहेत परंतु त्यांनी नोंदणी केलेली आहे अशा अन्न व्यावसायिकांनी त्वरित परवाना घ्यावा. बृहन्मुंबई विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अन्न व्यावसायिकांकडील परवाना, नोंदणी तपासण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व अन्न व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की, अन्न व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाअंतर्गत परवाना/नोंदणी करुनच अन्न व्यवसाय करावा. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक असून ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. जे अन्न व्यावसायिक विना परवाना/नोंदणी अन्न व्यवसाय करताना आढळून येतील त्यांचे विरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्याची तजवीज असून, त्यामध्ये पाच लाखापर्यंत द्रव्य दंडाची व सहा महिने कारावासाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने दिल्या आहेत.
परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरूनच व्यवसाय करावा. ऑनलाईन परवाना किंवा नोंदणीकरीता अर्ज करण्यासाठी www.foscos.fssai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध असून त्याठिकाणी लागणारी कागदपत्रे व तत्सम बाबींसाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. जेणेकरून कोणाच्याही मदतीशिवाय अर्ज करता येईल. अर्ज करताना अडचणी आल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई कार्यालयाने केले आहे.
***
इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर
फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा
वर्धापन दिन साजरा
मुंबई, दि. 28 : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी, मरोल एम आयडी सी अंधेरी येथील या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला FSSAI भारतीय खाद्य संरक्षण एवं मानके प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती रिता तेवतीया, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय आणि आयुक्त परिमल सिंग उपस्थित होते.
यावेळी खाद्य सुरक्षेचे प्रशिक्षणासाठी ITCFSAN च्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘इट राईट पॅट्रान चॅलेंज’ या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी खाद्य सुरक्षा क्षेत्रातील स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment