राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा
असे नाव देण्यात येणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 2 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबे, प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेणेकर,महासचिव प्रमिलाताई भिसे, कोषाध्यक्ष शाम वानखेडे, आयोजन समिती प्रमुख शिवराज शिंदे, प्रसिध्दी प्रमुख जयप्रकाश पाटील, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, केशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकरांसाठी राज्य पुरस्कार सुरु करण्याबाबत शासन विचार करेल. मात्र तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव, मार्गदर्शक तत्वे याबाबतची सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम शासकीय पातळीवर करण्यात यावेत याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कला, साहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल. येत्या 4 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment