Tuesday, 21 September 2021

 कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी

 अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठीत

 

            मुंबईदि. 20: राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

            महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात,लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी लोककलांना उत्तेजन द्यावे या हेतूने कलापथकांना भांडवली खर्चासाठी आणि प्रयोगासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदान मंजुरीसाठी शासनामार्फत समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे.

            या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष तर सहसंचालक हे सदस्य सचिव असतील. माया खुटेगावकरसुधीर कलिंगणदिनेश गोरेअभय तेरदाळेपुरुषोत्तम बोंद्रेअलंकार टेंभुर्णेसुरेशकुमार वैराळकरअंबादास तावरेविलास सोनावणेमोहित नारायणगावकर हे या समितीत सदस्य असतील.  ही समिती 8 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत कार्यरत असेल.

0000

 वर्षा आंधळे/विसंअ/20 सप्टेंबर 2021 


चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

           

            मुंबईदि. 20 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने  परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

            पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले कीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. दि.9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने 966 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून 100 विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची 20 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असेही श्री.सामंत यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi