Thursday, 2 September 2021

 कोकणच्या धर्तीवर जळगाव  जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·       मंत्रिमंडळ बैठकीत पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

 

        मुंबई दि. 1  :  जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली. या तिन्ही तालुक्यांमधील १०८ घरांची पूर्णत: तर ६५३ घरांची पूर्णपणे हानी झाली असून ३०६ दुकाने क्षतीग्रस्त झाली आहेत. ४०४ लहान तर ६१४ मोठी गुरे वाहून गेली असून तब्बल १५ हजार १९५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याबाबत त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत माहिती दिली. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून यानंतर लागलीच मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

             अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. या आपत्तीची माहिती मिळताच पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी तत्काळ चाळीसगाव तालुक्याला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला होता. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले होते. 

        या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री श्री.पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची सविस्तर माहिती दिली. या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ४२पाचोऱ्यातील ४ तर भडगावमधील २ असे एकूण ३८ गावे बाधीत झाली आहेत. या गावांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

          या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी श्री.पाटील यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून कोकणच्या धर्तीवर ही मदत आपदग्रस्तांना तातडीने प्रदान करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi